SHRIMANT

उपयोगी छोट्या कथा


कथेचे नाव- घुबड आणि टोळ
एक म्हातारे घुबड झाडाच्या ढोलीत झोपले असता एका टोळाने झाडाखाली गाणे म्हणायला सुरुवात केली. त्याने गाणे म्हणू नये म्हणून घुबडाने त्याला विनंती केली, बाबा रे, तू येथून जा, मला विनाकारण त्रास देऊ नकोस. तुझ्या किरकीरीने माझी झोप मोडते.' यावर तो टोळ त्या घुबडाचा धिक्कार करून त्याला शिव्या देऊ लागला. तो म्हणाला, 'तू लबाड, चोर आहेस, रात्रीचा बाहेर जाऊन चोरी करून पोट भरतोस नि दिवसा झाडाच्या ढोलीत लपून बसतोस.' त्यावर घुबड म्हणाले, 'अरे तू आता आपलं तोंड सांभाळ, नाहीतर मग पस्तावशील.' तरीही टोळ ऐकून घेईना. घुबडाची निंदा करून तो पुन्हा गाऊ लागला, मग घुबडाने त्याची खोटी स्तुती करायला सुरुवात केली, 'बाबा रे, क्षमा कर. तुझं गायन अगदी गोड आहे. माझ्या इतका वेळ ते लक्षात आलं नाही. तुझ्यासारखा गाणारा तूच. तुझ्या गाण्यापुढे कोकीळाही लाजेल. तुझा स्वर सारंगीपेक्षा चांगला आहे. बरी आठवण झाली. माझ्याकडे एक अमृताची कुपी आहे. त्यातले थोडेसं मी तुला देतो. फार वेळ गात राहिल्याने तुझा गळा अगदी सुकून गेला असेल नाही का ?' टोळाला खरोखरच तहान लागली होती, तो घुबडाजवळचे अमृत घेण्यासाठी त्याच्याजवळ गेला. लगेच घुबडाने त्याला उचलून आपल्या तोंडात टाकले.
तात्पर्य
- आपल्याला जे आवडते ते सर्वांनाच आवडेल असे नाही, हे लक्षात घेऊन दुसर्याच्या आवडीनिवडीचा जे विचार करीत नाहीत ते शेवटी आपला नाश करून घेतात.
Top of Form
अहंकारी राजाला धडा
एक अहंकारी राजा होता. त्‍याला आपल्‍या ऐश्‍वर्याचा आणि राज्‍याचा गर्व होता. तसेच आपली शक्‍ती आणि रूपावरही तो अहंगंड बाळगून असायचा. आपल्‍या बुद्धीचा टेंभा मिरवायचा. युद्धात जय मिळाला की त्‍याला गर्व चढायचा. आपल्‍यासमोर तो इतरांना तुच्‍छ लेखत असे. कोणाचा मुलाहिजा बाळगता त्‍याचा तो अपमान करत असे. दुस-याला कमी लेखण्‍याचा त्‍याचा प्रयत्‍न असायचा. या कारणांमुळे लोक त्‍याच्‍यावर नाराज असायचे. त्‍याच राज्‍यात एका विद्वान पंडीताने त्‍याला वठणीवर आणण्‍याचे ठरविले. एके दिवशी तो पंडीत राजाच्‍या दरबारात गेला आणि राजाला प्रणाम केला. राजाने उद्दामपणे प्रतिनमस्‍कारही केला नाही उलट त्‍याने पंडीताला गर्वाने विचारले,’’बोला पंडीत महाराज, तुम्‍हाला काय मदत पाहिजे. काय मागायचे असेल ते मागून घ्‍या, दान पाहिजे असेल तर दान घ्‍या किंवा धन पाहिजे, सोनेनाणे, जमीन, धान्‍य जे काही मागायचे ते तुम्‍ही माझ्याकडून मागून घ्‍या’’ पंडीतजीने राजाकडे एकवार पाहिले तो मोठमोठ्याने हसू लागला. राजाला दरबारातील लोकांना पंडीताच्‍या हसण्‍याचे कारण काही कळेना, हसण्‍याचा भर ओसरल्‍यावर पंडीत म्‍हणाला,’’राजन, तुम्‍ही मला काय दान देणार कारण तुमच्‍याकडे मला देण्‍यासारखे काहीच नाही.’’ पंडीताचे हे बोलणे ऐकताच राजा संतापून लालबुंद झाला, राजाचे सैनिक पंडीताला मारायला धावून आले पण सेनापतीने सैनिकांना आवरले पंडीताला पुढे काही बोलण्‍याची इच्‍छा आहे काय असे विचारले. त्‍यावर पंडीतजी म्‍हणाले,’’ महाराज, जरा थंड डोक्‍याने विचार करा, तुमचा जन्‍मच मुळी तुमच्‍या इच्‍छेने झाला नाही, मग रूप, सौंदर्य आणि पराक्रम हे गुण तुम्‍हाला कोठून मिळाले असते. आईवडीलांनी तुम्‍हाला जन्‍म दिला म्‍हणून तुम्‍ही जन्‍माला आलात. तुमचे धान्‍यभांडार हे धरतीमातेचे देणे आहे. तिने पिकवून तिच्‍या लेकरांसाठी अन्‍न पुरविले म्‍हणून तुम्‍ही ते सांभाळत आहात आणि खजिन्‍याचे म्‍हणाल तर धन हे करातून आलेले म्‍हणजेच प्रजेचे देणे आहे, राज्‍य हे तुम्‍हाला वाडवडीलांकडून मिळालेले वरदान आहे राहता राहिले शरीरातील प्राण पण तेही तुमचे नाहीत ते सुद्धा ईश्‍वराची कृपा आहे हे सगळेच जर तुम्‍हाला दुस-याने दिलेले असेल तर तुम्‍ही मला काय म्‍हणून देणार आणि दिलेल्‍या गोष्‍टीचा काय म्‍हणून गर्व बाळगणार.’’ एवढे बोलून पंडीताने राजदरबार सोडला राजाने त्‍यादिवसापासून गर्व पण सोडून दिला,

तात्‍पर्यः- जे आपले नाही त्‍यावर गर्व बाळगणे व्‍यर्थपणाचे आहे.

विश्‍वासाला तडा
एका लोककथेनुसार राम नावाच्‍या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता. तो त्‍या घोड्याची काळजी घ्‍यायचा. त्‍यामुळे त्‍या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते. शाम नावाच्‍या एका घोड्याच्‍या व्‍यापा-याने तो घोडा पाहिला आणि त्‍याला तो घोडा फारच आवडला. शामने तो घोडा मिळविण्‍याचे कारस्‍थान रचले. शामने रामच्‍या रोजच्‍या येण्‍याजाण्‍याच्‍या रस्‍त्‍यावर भिका-याचे सोंग घेतले आजारी असल्‍याचे नाटक करत बसला. दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्‍हा शाम जोरजोराने विव्‍हळू लागला, गयावया करू लागला. रामने ते पाहिले तो शामपाशी थांबला. शाम रामला म्‍हणाला,’’मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्‍या गावापर्यंत नेशील का,’’ रामला त्‍याची दया आली, त्‍याने त्‍याला घोड्यावर बसविले, आणि स्‍वतः पायी चालू लागला. थोडे पुढे जाताच शाम त्‍याचा घोडा घेऊन पुढे गेला त्‍याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला. दुस-या दिवशी शाम रामकडे आला म्‍हणाला,’’ अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्‍हणून मला आजारी भिका-याचे सोंग घ्‍यावे लागले.’’ यावर राम शांतपणे शामला म्‍हणाला,’’ मित्रा, मी तुला मदत केली होती ही गोष्‍ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्‍ट ऐकल्‍यावर जगात कोणीच गरीबांना, गरजूंना मदत करणार नाही. विश्‍वासघात करणे महापाप आहे’’

तात्‍पर्यः- गरजूला मदत करण्‍यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सूज्ञपणाचे ठरते.

राजा आणि संत
एका वनात दोन संत राहत होते. एकांतात आपल्‍या तपश्‍चर्येत लीन राहत होते. कधीतरी यात्रेकरूंचा जत्‍था जायचा तेव्‍हा ते संत त्‍यांच्‍याशी बोलत असत. त्‍याच यात्रेकरूकडून त्‍यांना तेथील राजास त्‍या संतांबाबत माहिती मिळाली. तो या दोघांना भेटण्‍यास निघाला. जेव्‍हा संतांना ही गोष्‍ट कळाली.तेव्‍हा त्‍या दोघांना वाटले की आता राजा येणार त्‍याने आपला चांगूलपणा पाहिला तर तो आपणास सतत भेटण्‍यास येईल, त्‍याच्‍याबरोबर अनेक माणसे येतील, त्‍यां माणसांच्‍या संगतीने अजून काही माणसे येतील अशाने या वनातील शांती भंग पावेल एकांत मिळणार नाही एकांत नसल्‍याने आपणास ध्‍यानसाधना करता येणार नाही. राजा आम्‍हाला दोघांना सामान्‍य माणूस समजेल असे काहीतरी केले पाहिजे. राजाचा लवाजमा तेथे पोहोचला तेव्‍हा राजाने पाहिले की ते दोघेही संत हातात लाठ्याकाठ्या घेऊन एकमेकांशी भांडत होते. पहिल्‍या संताने दुस-याला म्‍हटले,'' तू स्‍वत:ला कोण समजतोस, मी इतके ज्ञान मिळविले आहे की ते तू सात जन्‍मातही मिळवू शकणार नाही.'' दुसरा संत त्‍यावर म्‍हणाला,'' अरे तू तर पक्का खोटारडा आहेस, तुझ्या ज्ञानाच्‍या गप्पा मारून तू लहान मुलाला फसवू शकशील पण मला नाहीस. तुझ्यापेक्षा जास्‍त ज्ञान मी माझ्या शिष्‍यांना दिले आहे.'' राजाने त्‍याच्‍याबरोबरच्‍या लोकांनी हे भांडण पाहिले विचार करू लागले हे साधू संत तर सामान्‍य माणसाप्रमाणेच भांडत आहेत त्‍यांनी सर्वांनी असल्‍या साधूसंतांचा संग नको म्‍हणून वनातून जाणेच पसंत केले. राजा लोक जाताच दोन्‍ही संतांनी एकमेकांकडे पाहून मंदस्मित केले गळाभेट घेतली. दोन्‍हीही साधू आपल्‍या साधनेत रममाण झाले.

तात्‍पर्य : चांगली गोष्‍ट घडवून आणण्‍यासाठी कधीकधी चुकीच्‍या मार्गाचाही अवलंब करावा लागतो.

लालसेपायी जीव गेला
जय आणि विजय यांच्‍यात घनिष्‍ट मैत्री होती. दोघेही पट्टीचे पोहणारे होते. नदीच्‍या पाण्‍यात भरपूर मस्‍ती केली. तितक्‍यात स्‍थानिक प्रशासनाकडून बंधा-याकडून पाणी सोडण्‍यात येत असल्‍याची सूचना देण्‍यात आली. त्‍यामुळे दोघेही नदीच्‍या बाहेर आले. जेव्‍हा बंधा-यातील पाणी सोडण्‍यात आले तेव्‍हा नदीला पूर आल्‍यासारखी स्थिती निर्माण झाली. जय आणि विजय सुरक्षित स्‍थळी थांबले होते. नदीच्‍या पाण्‍याचा ओघ पाहत असतानाच नदीच्‍या प्रवाहात एक घोंगडी तरंगत येत असल्‍याचे दोघांच्‍याही दृष्‍टीस पडतील. विजयला ती घोंगडी ओढून आणावीशी वाटली. जयने त्‍याला थांबविण्‍याचा प्रयत्‍न केला. परंतु विजयने तोपर्यंत पाण्‍यात उडी मारली होती. तो घोंगडीजवळ गेला आणि तिला ओढत असतानाच त्‍याचे संतुलन बिघडले. विजय जितका जोम लावून किना-यावर येण्‍याचा प्रयत्‍न करत असतानाच पाण्‍यात उठणा-या लाटा त्‍याला दूर लोटत असत. मित्र असा संकटात सापडलेला पाहून जय ओरडला,''अरे मित्रा, घोंगडी सोड आणि परत निघून ये'' पण विजय म्‍हणाला,'' अरे जय मी घोंगडी सोडण्‍याचा खूप प्रयत्‍न करतो आहे पण घोंगडीनेच मला धरून ठेवले आहे.'' जयला कळून चुकले की विजयला त्‍या घोंगडीची लालसा निर्माण झाली आहे. विजयने घोंगडीसह किना-यावर येण्‍याचा खूप प्रयत्‍न केला पण तो अयशस्‍वी ठरला. शेवटी तो पाण्‍यात मृत्‍युमुखी म्‍हणतात.

तात्‍पर्य- कोणत्‍याही प्रकारची लालसा प्रसंगी आपल्‍या जीवाशी खेळू शकते.

No comments: