SHRIMANT

भाषणासाठी विषय निवडताना




     अलीकडे बऱ्याच ठिकाणी व्याख्यानांचे आणि स्थानिक प्रसिद्ध वक्त्यांच्या भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. यामुळे हौशी व नवशिक्या वक्त्यांना प्रासंगिक भाषण करण्याच्या अचानक संधी बऱ्याचदा समोर येतात. अश्यावेळी कोणत्या विषयावर काय बोलावे, हे कमी सरावलेल्या वक्त्यालाच नव्हे तर अगदी नेहमी भाषण करणाऱ्या वक्त्याला सुद्धा गोंधळात टाकू शकते. इथूनच आपला मुख्य प्रश्न तयार होतो : भाषणासाठी किंवा व्याख्यानासाठी विषय कसा निवडावा?
        उत्सवातील छोट्या भाषणाच्या संधी, शाळेमध्ये, छोटेखानी कार्यक्रमामध्ये, सोसायटीच्या मिटींग्ज किंवा इतर ठिकाणी अनेक वेळा भाषण करण्याच्या संधी उपलब्ध होतअसतात. हौशी वक्ता किंवा वक्तृत्वाची किंवा नेतृत्वाची आवड असणाऱ्या व्यक्तींसाठी ही एक प्रकारची पर्वणीच असते. पण, ऐनवेळी विषय न सुचल्याने अशा संधी हातातून जातात आणि स्वतःमधल्या उमलत्या वक्त्याची वाढ खुंटल्यासारखी वाटायला लागते. कधी-कधी असे प्रसंग मनावर खोलवर परीणाम करतात. कधी-कधी ‘उगीच आपण लोकांच्या चेष्टेचा विषय झालो’ अशीही दीर्घकाळ मनात राहणारी पश्चातापाची भावना तयार होऊ शकते. हे सगळे टाळायचे असेल तर वक्तृत्वामध्ये विषयाची निवड कशी करावी याचे मुलभूत ज्ञान असणे आवश्यक आहे.


         निमंत्रित कार्यक्रमामध्ये भाषणाच्या संधी मिळत असतील तर त्यासाठी त्या-त्या प्रसंगानुरूप आणि कार्यक्रमाच्या रुपरेषेप्रमाणे आधी विषय निवडून तयारी करता येते. यामध्ये निमंत्रित वक्त्याला बहुतेकवेळा भाषणाचे विषय दिले जातात. पूर्वी कळवलेल्या किंवा दिलेल्या विषयास अनुसरून स्वतःचे विचार मांडणे ही तितकी अवघड प्रक्रिया नसते. दिलेला विषय आणि त्याविषयी सध्या सुरु असलेले आणि पारंपारीक विचार यांची सांगड घालून आपले व्यक्तिगत भाष्य त्यामध्ये टाकून एक सर्वांना आवडेल असे भाषण निश्चित देता येवू शकते. हा झाला भाषणाचा ‘झटपट’ फॉर्मुला.  अर्थात, काहीवेळा अश्या भाषणांची तयारी करण्यासाठी त्या-त्या विषयासंबंधी स्थानिक जाणकार मंडळींकडून माहिती घेणे, इतिहास समजून घेणे आणि दिलेल्या विषयासंबंधी थोडे वाचन करणे, चित्रफिती पाहणे, इंटरनेट वापरून माहिती गोळा करणे असे प्रकार करावे लागतात. आयोजक व श्रोत्यांच्या अपेक्षा काय आहेत हे समजून तयारी करणे, अश्या प्रसंगी आवश्यक ठरते. काही वेळेस आयोजक वक्त्याला त्याच्या आवडीच्या विषयावर भाषण करण्यास सुचवतात. अश्यावेळी विषय कसा निवडावा हे गोंधळात टाकणारे असू शकते. अश्यावेळी आपले श्रोते कोण आहेत आणि कार्यक्रमाचे औचित्य काय आहे, या दोन गोष्टी ध्यानात ठेवून वक्त्याने आपल्या बौद्धिक क्षमतेस अनुसरून विषय निवडणे आवश्यक असते.
        सामान्यतः वक्त्याने विषय असा निवडावा की ज्यावर संदर्भ किंवा वाचन कमी असले तरी चिंतन आणि चर्चा जास्त झाली आहे किंवा होऊ शकते. यामुळे अत्यंत ओघवत्या पद्धतीने आणि सामान्य श्रोत्याच्या मनात बसतील असे मुद्दे भाषणातून प्रकट होतात. जास्त विद्वत्तापूर्ण भाषणापेक्षा श्रोत्यांच्या मनाला भिडणारे भाषण करणे, हा यशस्वी भाषणाचा निकष म्हणून घ्यायला हरकत नाही. निवडीचे स्वातंत्र्य असताना वक्त्याने स्वतःच्या हृदयाच्या आणि विचारांच्या जवळ असणारा, स्वतःच्या आयुष्याशी, व्यवसायाशी नाते सांगणारा विषय निवडणे उचित आहे ज्यामुळे श्रोत्यानाही अनुभवावर आधारीत विचार ऐकायला मिळतात. वाचन करून, चिंतन करून मिळालेल्या माहितीपेक्षा श्रोते व वक्ता यामधील समान अनुभवावर आधारीत माहिती सामान्य श्रोत्यांवर प्रभावी परीणाम करते असा आजपर्यंत बऱ्याच वक्त्यांचा अनुभव आहे.

            वक्त्याची शैली जर उत्स्फूर्त भाषण करण्याची असेल तर मनामध्ये भाषणाचा ढोबळ आराखडा तयार करणे उपयुक्त ठरते. सामान्यतः भाषणात सांगायची ‘मध्यवर्ती कल्पना किंवा विचार’ एकदा निश्चित केले की मग त्या विचाराचे सादरीकरण कसे करायचे याचा अंदाज येवू लागतो. हा सर्व प्रकार करताना भाषणाचे औचित्य म्हणजे भाषण कोणत्या प्रसंगी, ठिकाणी, आणि कोणासमोर द्यायचे आहे तसेच आयोजक कोण आहेत, हे सतत ध्यानात ठेवणे आवश्यक आहे. हे झालं पूर्व-निमंत्रित विषयावरील भाषणामध्ये विषयाला न्याय कसा द्यावा आणि तयारी कशी करावी या विषयी.  
        सोसायटी किंवा उत्सव मंडळांची मिटिंग किंवा छोटेखानी कार्यक्रम असतो किंवा गावाच्या शाळेत किंवा ग्रामपंचायती मध्ये जयंती सारखा कार्यक्रम साजरा होत असेल आणि आदल्या रात्री किंवा अगदी कार्यक्रमाच्या दिवशीच सकाळी-सकाळी आयोजक मंडळी येतात आणि अध्यक्षपद किंवा प्रमुख पाहुणे म्हणून येण्याची गळ घालतात आणि मग चार शब्द बोला असा आग्रहही धरतात. अशा प्रसंगी बऱ्याचवेळेस काय बोलावे सुचत नाही. कमी सरावलेला किंवा लाजऱ्या व्यक्तिमत्वाची व्यक्ती असेल तर बऱ्यापैकी गोंधळून जाते. वक्तृत्वाची आवड असणाऱ्या आणि भाषण करण्याच्या संधीचा लाभ घेण्यास इच्छूक असणाऱ्या व्यक्तींनी काही मुद्दे समजून घेतले तर असे प्रसंग टाळ्या घेणारे भाषण आपसूक तयार करणारे, स्वतःविषयी अभिमान वाढवणारे, स्वतःच्या कुटुंबियांचा, समाजाचा, नातेवाईकांचा, व्यवसायाच्या ठिकाणी असणाऱ्या मित्र मंडळींचा आदर प्राप्त करून देणारे ठरू शकतात. अचानक कराव्या लागणाऱ्या भाषणासाठी विषय निवडताना काही साधे मुद्दे समजून घेतले तर टाळ्या घेणारे भाषण निश्चित देता येवू शकते.
        प्रथम, ज्या ठिकाणी भाषण दिले जात आहे तिथल्या परिस्थिती व प्रसंगानुरूप औपचारीक किंवा अनौपचारीक सुरवात करावी. छोट्या सोसायटीमध्ये किंवा गावांमध्ये बहुतेक सर्वजण परस्परांना ओळखत असतात अश्यावेळी अत्यंत औपचारीक सुरवात कधी-कधी शिष्ट म्हणवली जाऊ शकते. वेगळ्या भाषेत सांगायचे तर ‘नमनाला घडाभर तेल’ वगेरे प्रतिक्रिया येवू शकतात. अगदी सुरवातीला भाषण देण्याच्या ठिकाणाचे वातावरण आणि तिथली बोलण्यातली ‘औपचारीकता’ ठरवली की मुख्य काम झाले. कारण, यामुळे श्रोत्याला भाषणाची दिशा काय असावी, याविषयी सजगता येते. अशा सजगतेमधून मग उत्स्फूर्तपणे विचार स्फुरतात. अशा प्रसंगी शक्य तितके ‘श्रोत्यांच्या जिव्हाळ्याचे विषय काय असावेत’ याविषयी निरीक्षण करणे आवश्यक ठरते. साधारण श्रोत्यांना काय-काय बोललेलं आवडेल याचा अंदाज आला की स्वानुभव किंवा आपल्या सोबत आधी घडलेले प्रसंग यांचा आधार घेऊन उत्स्फुर्तपणे भाषण दिले तर ते श्रोत्यांना आवडण्याची जास्त शक्यता असते.
विषय निवडताना श्रोत्यांच्या वयोगटाचा विचार महत्वाचा ठरतो. शाळेमध्ये भाषण करताना शालेय विद्यार्थी-विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक असते, शिक्षक नंतर येतात. तशीच परिस्थिती गावामध्ये भाषण करताना असते ग्रामस्थ भाषणाचे मुख्य केंद्र तर ग्रामपंचायत सदस्य, युवानेते वगेरे  दुय्यम असतात. भाषणाच्या विषय निवडीसाठी श्रोत्यांचे पृथकरण करण्याचे किंवा त्याविषयी मजबूत आडाखे बांधण्याचे कौशल्य शिकून घेणे आवश्यक आहे, पण त्याविषयी नंतर कधीतरी सविस्तर लिहू.
       वरील पद्धतीने विषय निवडताना वक्त्याने आपली शक्तिस्थाने ओळखूनच विषय निवडावा. पाण्यातल्या माश्याने उगीच आकाशात उडत विहंगम दृश्य वर्णन करणे श्रोत्यांचे अनावश्यक मनोरंजक करणारे होऊ शकते. आपल्याला माहीत असलेल्या, आपल्या वाचनात, लेखनात, व्यवसायात अढळलेल्या कथा, प्रसंग, दृष्टांत आदीची सांगड घालून शक्य तितके उत्स्फूर्त बोलणे हे विषय निवडीच्या गोंधळाला कमी करते.
         भाषणाचा विषय निवडणे याविषयी वकृत्व शिकलेल्या, शिकणाऱ्या, व शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तींनी गंभीर असणे स्वाभाविक आहे. परंतु, अचानक दिलेलं भाषण हे विषयालाच धरून असावे असा आग्रह नसतो हेही आपण ध्यानात घेणे आवश्यक आहे . एक तांत्रिक बाब म्हणून भाषणाला मुख्य विषय असावा, असे वाटणे स्वाभाविक आहे. पण, बऱ्याच वेळा हा आग्रह म्हणजे तंत्राच्या अवास्तव समजुती मधून तयार झालेला आणि उत्स्फूर्त बोलण्याला अडथळा घालणारा असू शकतो. या प्रकारच्या भाषणामध्ये वक्त्यांनी निश्चित विषयाचा आग्रह धरण्यापेक्षा ‘स्फुट’ सादरीकरण करणे जास्त प्रभावी ठरते. कधीही मुक्तपणे आणि प्रवाहीपणे बोलणे वक्त्याला वेगळ्या उंचीवर घेऊन जाते आणि त्याची वक्तृवावर असणारी पकड वाढवते.
      ‘भाषण’ हा दिलेल्या विषयावर बोलण्याचा प्रकार न ठरता ‘भाषण’ हा जनतेसमोर आपला विषय ठेवून त्यास समजावून देण्याचे उपयुक्त माध्यम ठरते. श्रोतेही अश्या मुक्तपणे बोलणाऱ्या वक्त्यांना पसंत करतात कारण अजूनही ‘भाषण स्वातंत्र्य’ मुलभूत अधिकार म्हणून देण्यात आले असले तरीही लोकांना बोलता येत नाही आणि याची जाणीव बऱ्याच लोकांना आहे.  म्हणूनच ‘बोलणारा’ माणूस ‘मोठा’ होण्याची जास्त शक्यता आहे.