SHRIMANT

Saturday, July 13, 2024

अधिकाऱ्यांची मजा आणि रुग्णांना सजा; भ्रष्ट आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे ढोल बजाव आंदोलन

अधिकाऱ्यांची मजा आणि रुग्णांना सजा; भ्रष्ट आरोग्य अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी रुग्ण हक्क परिषदेचे ढोल बजाव आंदोलन
पुणे - रुग्णांच्या हक्काच्यासाठी, भ्रष्टाचार करणाऱ्या लाचखोर आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात झोपलेल्या पुणे मनपा आयुक्तांना जागे करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या वतीने आज जोरदार ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. पुणे महानगरपालिकेची अखंड बारा वर्षे रुग्णांना दिलासा देणारी शहरी गरीब योजना खिळखिळी करणाऱ्या आणि शहरी गरीब योजनेची बिले मंजूर करून घेण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या भ्रष्ट सहाय्यक आरोग्य अधिकाऱ्यांच्या विरोधात आज रुग्ण हक्क परिषद आणि आंदोलनात सहभागी पक्ष संघटनांच्या वतीने जोरदार ढोल बाजाओ आंदोलन करण्यात आले. पुणे मनपा समोर जोरदार ढोल बजाव आंदोलनाचे नेतृत्व रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी केले. यावेळी भीमछावा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्याम गायकवाड, निलेश गायकवाड, लोक जनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष संजय अल्हाट, रुग्ण हक्क परिषदेच्या पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठ्ये, दलित पॅंथरचे पुणे शहराध्यक्ष राहुल गायकवाड, घनश्याम मारणे, सामाजिक कार्यकर्ते रेश्मा जांभळे, कविता डाडर, प्रभा अवलेलू, अरुणा हरपळे, अनिल गायकवाड, भीमराज फडके, नीलम गायकवाड, युवक क्रांती दलाचे सुदर्शन चखाले, रोहन गायकवाड, आशिष गांधी, विकास साठे, गायक अशोक गायकवाड, के. सी. पवार, फारूक तांबोळी, हालीमा शेख, दिलीप ओव्हाळ आदींनी पुणे महानगरपालिकेच्या शहरी गरीब योजनेच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात ढोल वाजवत जोरदार आंदोलन केले. यावेळी रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, गेली दहा वर्षे शहरी गरीब योजनेचे एक लाख रुपये डिस्चार्जच्या दिवशी सुद्धा रुग्णाला मिळायचे, मात्र आता रुग्ण ज्या दिवशी ऍडमिट असेल त्या दिवशीच कार्ड काढले असेल तरच लाभ मिळतो यामुळे अनेक रुग्णांना आर्थिक त्रासातून कर्जबाजारी व्हावे लागत आहे. यावेळी पुणे महानगरपालिकेचे आरोग्य विभागाच्या सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विनोद नाईक यांच्या भ्रष्टाचारी कार्यपद्धती विरोधात अनेकांनी ताशेरे ओढले. डॉ. मनीषा नाईक यांची काळ्या पैशांची वसुली करणारे लिपिक मनोज पानसे आणि आरोग्य विभागातील शिपाई बाबा इनामदार डॉ. मनीषा नाईक यांच्यासाठी मोठ्या पंचतारांकित हॉस्पिटल कडून शहरी गरीब योजनेची बिले मंजूर करून घेण्यासाठी कोट्यावधी रुपयांची लाच वर्षभर गोळा करतात, त्यांचे निलंबन करून चौकशीची मागणी देखील यावेळी करण्यात आली. भीमछावा संघटनेचे अध्यक्ष श्याम गायकवाड आणि लोक जनशक्ती पार्टीचे संजय अल्हाट यांनी रुग्णांच्या हक्काची सनद आणि बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टचे उल्लंघन केले जात असल्याचा गंभीर आरोप केला तर हॉस्पिटलला परवानगी देण्यासाठी, हॉटेल, लॉज आणि फाईव्ह स्टार- सेव्हन स्टार हॉटेलला परवानगी देण्यासाठी आणि बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीला आरोग्य विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी लाखो रुपयांची लाख सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विनोद नाईक त्यांच्या हस्तका मार्फत घेतात, असा गंभीर आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला. रुग्ण हक्क परिषदेच्या वतीने झालेल्या जोरदार ढोल बजाव आंदोलनामुळे पुणे महानगरपालिका परिसरामध्ये आरोग्य विभागात चालणाऱ्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई तात्काळ केली जावी, असे देखील मत अनेकांनी व्यक्त केले.

No comments: