SHRIMANT

Friday, August 15, 2025

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस

आळंदी Mee24taas team मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आळंदी, पुणे येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण जयंती दिनाच्या पावनपर्वावर आयोजित सुवर्ण कलशारोहण कार्यक्रमादरम्यान सुवर्ण कलश पूजन केले.
भगवान श्रीकृष्ण यांनी जगाला भगवद्गीतेचे ज्ञान दिले, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी ज्ञानेश्वरीमार्फत 9000 ओव्यांमधून मराठी भाषेत हे तत्वज्ञान सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवले. गीतेचे मराठीत विवेचन करणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी मंदिरावर सुवर्ण कळस जन्माष्टमीच्या दिवशी चढविला जाणे हा एक सुवर्णयोग असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. भगवद्गीतेचा संदेश, पसायदानाचा अमृतस्वर आणि वारकरी परंपरेची मूल्ये या सुवर्ण कलशातून पुन्हा उजळून निघाली आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी सुवर्ण कलशारोहणाबरोबरच मराठा योद्धा महादजी शिंदे यांनी उभारलेल्या महाद्वाराचा जीर्णोद्धार केल्याने त्याला मूळ स्वरूप प्राप्त होईल आणि मंदिर परिसराच्या पावित्र्यात भर पडेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी 21 वर्षाच्या जीवनात दिलेला विचार आपल्याला शतकानुशतके मार्ग दाखविणारा आहे, म्हणूनच समाधी मंदिरात आल्यावर मिळणारी ऊर्जा चांगले काम करण्याची ऊर्जा मिळते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. गीतेचे तत्वज्ञान, ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आज रशियन, स्पॅनिश आणि जर्मनसह अनेक भाषांमध्ये पोहोचवणार्‍या 'श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी, आळंदी देवाची'च्या संकेतस्थळाचे उदघाटन देखील यावेळी संपन्न झाले. ही भारतीय सांस्कृतिक वारशासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुवर्ण कलशासाठी दान देणाऱ्या दानशूर व्यक्तींचे, विश्वस्तांचे आणि आयोजकांचे अभिनंदन करत, ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीस्थळाची ऊर्जा आणि प्रेरणा प्रत्येकाला मार्गदर्शक ठरते, असे प्रतिपादन केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, मंत्री जयकुमार गोरे, खासदार श्रीरंग आप्पा बारणे व अन्य मान्यवर उपस्थित होते.

No comments: