SHRIMANT

Wednesday, January 1, 2025

ज्ञानेश्वर महाराज संस्थान तर्फे ओळख श्री ज्ञानेश्वरी कार्यशाळेत पुस्तकांचे वाटप

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : विद्यार्थ्यांच्या मूल्य संवर्धनास सुरू असलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाच्या अनुषंगाने नववर्षाच्या प्रारंभी अनेक शाळां मध्ये सुरू असलेल्या या उपक्रमात व अध्यापनात एकसूत्रता राहावी या हेतूने श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी तर्फे श्री ज्ञानेश्वर विद्यालयात ओळख श्री ज्ञानेश्वरीची उपक्रमाच्या कार्यशाळेचे व पुस्तक वाटपाचा कार्यक्रम उत्साहात झाला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थलथानी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी विश्वस्त योगी निरंजननाथ होते. या प्रसंगी व्यासपीठावर श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त ह. भ. प. अभयजी टिळक, ह. भ. प. सुभाष महाराज गेठे, माऊली संस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव अजित वडगावकर, ह. भ. प.भागवत महाराज साळुंके, ह. भ. प. वासुदेव महाराज शेवाळे, माजी शिक्षणाधिकारी चौधरी साहेब, चरित्र समितीचे सर्व सदस्य अर्जुन मेदनकर, जिल्ह्यातील विविध संस्थांचे अध्यक्ष, सचिव तसेच शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, अध्यापक, समन्वयक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविकात अध्यक्ष प्रकाश काळे यांनी ओळख श्री ज्ञानेश्वरी उपक्रमाचा मुख्य उद्देश व्यक्त करत ज्ञानेश्वर महाराजांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथाच्या अभ्यासामुळे विद्यार्थ्यांच्या जीवनात होणारे सकारात्मक बदल हीच खरी या उपक्रमाची शिदोरी असल्याचे सांगत या संस्कारमुळे कार्यात सर्वांनी सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षणाधिकारी कृष्णकांत चौधरी यांनी व्यक्तीला सुखी आनंदी व यशस्वी जीवन जगायचे असेल तर जीवनात योग्य दिशा व वेध असणे गरजेचे आहे आणि हे ओळख श्री ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून मिळत असल्याचे सांगत या उपक्रमाचे व उपक्रमाशी संबंधित सर्वांचे कौतुक केले. यावेळी ह. भ. प. अभय टिळक, ह. भ. प. सुभाष महाराज गेठे यांनी प्रथम या उपक्रमाचे वाढते स्वरूप व यामुळे विद्यार्थी जीवनात घडणारे संस्कार याचा आनंद व्यक्त केला. तसेच अभ्यासक्रमाची रचना सांगताना विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, पातळी व त्यांच्या विविध कक्षा लक्षात घेऊनच अभ्यासक्रम तयार केल्याचे सांगितले. प्रकाशित केलेल्या पुस्तकातील अभ्यासक्रम विद्यार्थ्यांसाठी कसा उपयोगी आहे हे सांगताना त्या पुस्तकातून अध्यापकांनी विद्यार्थ्यांना कसे अध्यापन करावे, योग्य मार्गदर्शन करून त्यांच्यावर संस्कार रुजवले तर या उपक्रमातून एक देशाचा आदर्श नागरिक घडणार असल्याचे सांगितले. उपक्रमातील संवेदना या मुलांमध्ये उतरविण्याची जबाबदारी अध्यापकांची असल्याचेही सांगितले. विद्यार्थ्यांचे जीवन जेव्हा रसमय होईल तेव्हा हा उपक्रम सार्थक झाला असे म्हणता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्ष मनोगतात योगी निरंजनात यांनी देवस्थान कडे या संस्कारक्षम उपक्रमाचे पालकत्व असल्याचा आनंद व्यक्त केला. व उपक्रमात येणाऱ्या अडचणी समस्या देवस्थान सोडविण्यास तत्पर असल्याचे सांगितले. आभार अजित वडगावकर यांनी मानले. सूत्रसंचालन उमेश महाराज बागडे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाचे सांगता झाली. त्यानंतर महाप्रसाद झाला.

No comments: