SHRIMANT

Thursday, February 27, 2025

मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी व ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवार यांच्या कडून शालेय विध्यार्थी यांच्या मूल्य संवर्धनासाठी ओळख श्री ज्ञानेश्वरीची व परिचय भागवत धर्माचा ओळख ज्ञानेश्वरीची या दोन पुस्तकांचा प्रकाशन सोहळा रविवारी ( दि. २ ) सकाळी दहा वाजता उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत यांचे हस्ते माऊली मंदिरात होणार आहे. अशी माहिती ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी दिली. ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवाराचे वतीने मराठी भाषा गौरव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषा गौरव दिना निमित्त श्री ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा पूजन, श्री ज्ञानेश्वरी, हरिपाठ पूजन, दीप प्रज्वलन उपस्थित मान्यवरांचे हस्ते हरिपाठ वाटप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन व ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवाराचे वतीने आयोजित पुस्तक प्रकाशन सोहळ्याची माहिती देताना काळे बोलत होते. अध्यक्षस्थानी श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक होते. या प्रसंगी ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारातील अर्जुन मेदनकर, महादेव पाखरे , विश्वम्भर पाटील, विलास वाघमारे, बापू गोरे, ज्ञानेश्वर घुंडरे, रोहिदास कदम, धनाजी काळे,प्रकाश भागवत, कैलास आव्हाळे आदी उपस्थित होते.
यावेळी प्रकाशन सोहळ्याची माहिती देताना काळे म्हणाले, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटी व ओळख श्री ज्ञानेश्वरी परीवार यांच्या संयुक्त विद्यमान ओळख श्री ज्ञानेश्वरी पुस्तकाचे प्रकाशन रविवारी ( दि. २ ) सकाळी १० वाजता श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात होत आहे. पुस्तकाचे प्रकाशन उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदयजी सामंत यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी श्री ज्ञानेश्वरी महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, विश्वस्त अॅड. राजेंद्र उमाप, पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्त, भावार्थ देखणे, ह.भ.प. शांतीब्रह्म मारुती बाबा कुरेकर महाराज, ह.भ.प. डॉ. नारायण म. जाधव, आळंदी देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ. अभय टिळक आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या प्रकाशन सोहळ्यांत ओळख श्री ज्ञानेश्वरी या पुस्तकाचे लेखक ह.भ.प. सुभाष म. गेठे, ह.भ.प. वासुदेव म.शेवाळे, ह.भ.प. भागवत म. साळुंके, तसेच पुस्तक निर्मीती सेवा कार्यातील मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात येणार आहे. या प्रकाशन सोहळ्यास ओळख श्री ज्ञानेश्वरी या उपक्रमात सर्व संस्था प्रमुख, प्राचार्य, मुख्याध्यापक, संस्था पदाधिकारी, अध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ, ज्ञानेश्वर महाराज यांच्या संत साहित्यावर प्रेम करणारे, वारकरी, भाविक उपस्थित रहाणार असल्याचे ओळख श्री ज्ञानेश्वरी परिवारा तर्फे प्रकाश काळे यांनी सांगितले. मराठी भाषा दिना निमित्त मराठी भाषेचे महत्त्व प्रकाश काळे यांनी माऊलींचे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरीतील ओव्यांचा संदर्भ देत विशद करून मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून २ मार्च रोजी आळंदी माऊली मंदिरात होत असलेल्या प्रकाशन सोहळ्यास भाविक, नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले. ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलांसाठी मूल्य संवर्धनाचा, संस्कारक्षम मुले घडावीत यासाठी सुरु असलेला उपक्रम ७५ शाळांत सुरु असून हा उपक्रम सर्वदूर जावा यासाठी यात सर्व शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी श्रीधर सरनाईक यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अर्जुन मेदनकर यांनी मानले. पसायदानाने मराठी भाषा गौरव दिनाची सांगता झाली.

No comments: