SHRIMANT

Saturday, January 3, 2026

संत तुकोबांच्या तपोभूमी रक्षणासाठी शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची मधुसूदन पाटील महाराजांनी घेतली भेट

देहू आळंदी-सातारा येथे आयोजित
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा माननीय आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांची संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मधुसूदन पाटील महाराज यांनी नुकतीच भेट घेतली. या भेटीत संत तुकोबांच्या तपोभूमीच्या रक्षणाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. मधुसूदन महाराजांनी सांगितले की, श्रीक्षेत्र देहूजवळील संत तुकोबांची ध्यान-चिंतन-साक्षात्कार तपोभूमी म्हणून वारकरी संप्रदायात प्रसिद्ध असलेले श्रीक्षेत्र भंडारा व श्रीक्षेत्र भामचंद्र डोंगर यांना शासनाने सन २०११ मध्ये अधिसूचना काढून राज्य संरक्षित स्मारकाचा दर्जा दिला आहे. मात्र या ऐतिहासिक संतपीठ परिसरात शासनपुरस्कृत एमआयडीसी व काही बिल्डरांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर विध्वंस सुरू असून, तो तातडीने थांबवण्यात यावा, अशी ठाम मागणी त्यांनी केली. तसेच १९५८ च्या सांस्कृतिक पुरातत्त्व विभागाच्या अधिनियमाचे उल्लंघन करून राज्य संरक्षित स्मारकाच्या संरक्षित क्षेत्रात झालेले अतिक्रमण त्वरित हटवावे, संत तुकोबांच्या तपोभूमी डोंगराभोवती तटबंदी उभारावी व घोराडा-भंडारा-भामचंद्र डोंगरांना सन २०११ च्या अधिसूचनेनुसार कायमस्वरूपी सुरक्षा देण्यासाठी शासनाने तातडीने अध्यादेश काढावा, अशी मागणी प्रत्यक्ष भेटीत मांडण्यात आली. याबाबत मुख्यमंत्र्यांसाठी तयार केलेले निवेदनही शिवेंद्रसिंह राजे भोसले यांना सादर करण्यात आले. या मागण्यांना प्रतिसाद देताना माननीय शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी शिष्टमंडळाला आश्वासन दिले की, “या प्रकरणात मी जातीने लक्ष घालेन व माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रत्यक्ष बैठक घेऊन सविस्तर चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन.” या भेटीप्रसंगी शिवेंद्रसिंह राजे यांच्या पत्नी सौ. वेदांकी राजे भोसले यांचीही शिष्टमंडळाने भेट घेतली. त्यांना “तुकोबा! संतभूमीच्या रणांगणात” ही भामचंद्र डोंगर संघर्षाचा इतिहास मांडणारी पुस्तिका भेट देण्यात आली. तसेच छत्रपती शिवरायांच्या राजमुद्रेत बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या बदलांकडेही लक्ष वेधण्यात आले. सौ. वेदांकी राजे भोसले यांनी ही पुस्तिका वाचून या विषयावर गांभीर्याने चर्चा करून योग्य निर्णयासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. या शिष्टमंडळात कै. महाराज अभयसिंह राजे भोसले यांचे जुने कार्यकर्ते श्री. बाळासाहेब शितोळे (आंबेवाडी), वास्तुविशारद तज्ज्ञ सुभाष शामराव निकम (अपशिंगे), अजिंक्यतारा साखर कारखान्याचे शेती विभाग अधिकारी गजानन विभूते (फत्त्यापूर) तसेच संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे संपर्क प्रमुख सचिन पाटील येरळीकर यांचा समावेश होता. या भेटीची सविस्तर माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख बब्रुवान शेंडगे पाटील यांनी दिली.

1 comment:

Anonymous said...

॥ साद भामचंद्र मुक्तीची: चला आझाद मैदानाकडे! ॥

सप्रेम जय हरी,

आज आपल्या भक्तीवर आणि वारकरी परंपरेच्या अस्मितेवर संकट आले आहे! जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची तपोभूमी, जिथे त्यांना आत्म साक्षात्काराचा लाभ झाला, तो 'भामचंद्र डोंगर' आज धोक्यात आहे.

दुर्दैवाने, शासनाची चुकीची धोरणे, MIDC चा विस्तार आणि भू-माफियांचा वाढता हस्तक्षेप यामुळे या पवित्र तीर्थक्षेत्राचे अस्तित्व धोक्यात आले. हा डोंगर म्हणजे केवळ दगड-मातीचा ढिगारा नसून, आपल्या तुकोबारायांच्या साधनेचा जिवंत वारसा आहे. हा वारसा नष्ट झाला, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कधीच माफ करणार नाहीत.

आता वेळ आली आहे संघर्षाची!

आपण आजवर अनेक सहली केल्या, अनेक तीर्थयात्रा केल्या पण आता वेळ आली आहे आपल्या अध्यात्मिक पर्यटन तीर्थक्षेत्राला वाचवण्यासाठी 'आंदोलन' करण्याची.! जर आपण आज एकत्र आलो नाही, तर भामचंद्र डोंगराचे नाव फक्त इतिहासाच्या पानात उरेल.

महत्वाची माहिती:.......
* पुढील दिशा - भामचंद्र डोंगर वाचवण्यासाठी भव्य जनआंदोलन !
दिनांक : -१० मार्च २०२६
स्थळ:- आझाद मैदान, मुंबई. त्यासाठी * श्री गुरुदेव सेवा मंडळा* च्या वतीने माधवी ताई सर्व भक्तभाविकांना कळकळीची साद घालत आहेत. 'भक्ती' सोबत आता 'शक्ती' दाखवण्याची गरज आहे. आपले आद्य कर्तव्य समजून जास्तीत जास्त संख्येने या आंदोलनात सहभागी व्हा.
"तुका म्हणे आतां न व्हावें गबाळ ।..
आपला वारसा वाचवण्यासाठी आता गाफील राहून चालणार नाही!
चला, आपल्या तुकोबारायांच्या तपोभूमीसाठी पाऊल उचलूया! एक होऊया!!🙏