SHRIMANT

Monday, September 14, 2026

ढोल-ताशांच्या गजरात श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत गणरायाचे आगमन

‘शिस्त–स्वच्छता–गुणवत्ता’ या त्रिसूत्रीवर आधारित आकर्षक देखावा; विविध शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन
आळंदी : आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यामंदिर आणि श्री ज्ञानेश्वर बालक मंदिर येथे श्री गणेश चतुर्थीच्या मंगलमय मुहूर्तावर ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे उत्साहात आगमन झाले. संस्थेचे सचिव मा. श्री. अजित वडगांवकर यांच्या हस्ते श्री गणेशमूर्तीची विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशोत्सवानिमित्त प्रशालेत अष्टविनायक गणपतींची माहिती तसेच संस्थेची त्रिसूत्री **‘शिस्त–स्वच्छता–गुणवत्ता’** यावर आधारित आकर्षक देखावा उभारण्यात आला आहे. उत्सवाच्या कालावधीत भजन, गीतगायन, निबंधलेखन, वक्तृत्व व चित्रकला अशा विविध शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिला कर्मचाऱ्यांच्या सहभागातून सामूहिक अथर्वशीर्ष पठणही करण्यात येणार आहे. यावेळी संस्थेचे सचिव अजित वडगांवकर यांनी गणेशोत्सवाचे महत्त्व विशद केले. “कोणत्याही मंगलकार्याची सुरुवात श्री गणरायाला वंदन करून केली जाते. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊलींच्या ज्ञानेश्वरीची सुरुवातही गणरायाला वंदन करूनच झाली आहे,” असे त्यांनी सांगितले. गणेशोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, संस्कृती, शिस्त आणि सामाजिक बांधिलकीची भावना वृद्धिंगत व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. याप्रसंगी प्राचार्य किसन राठोड, मुख्याध्यापक प्रदीप काळे, उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, पर्यवेक्षिका हेमांगी कारंजकर, शिक्षक प्रतिनिधी प्रमोद कुलकर्णी, शिक्षकेतर प्रतिनिधी सुजाता रंधवे यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गणरायाची आरती झाल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले. पसायदानाने कार्यक्रमाची मंगलमय सांगता झाली.

No comments: