SHRIMANT

Tuesday, September 8, 2026

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक दिनी विद्यार्थ्यांनी सांभाळली शाळेची धुरा!

शिक्षकांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; अध्यापनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शिक्षक दिन उत्साहपूर्ण व आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला. शिक्षक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका स्वीकारत शाळेच्या दैनंदिन शैक्षणिक कामकाजाची धुरा सांभाळली. विद्यार्थी मुख्याध्यापिका राधिका फपाळ, विद्यार्थी उपमुख्याध्यापिका संस्कृती नवले, विद्यार्थी पर्यवेक्षिका गायत्री जोशी, श्रावणी बांडगे, साक्षी लहाने पर्यवेक्षक लोकेश भंगाळे, कृष्णा शिंदे, विशेष वाघ व विद्यार्थी शिक्षक - शिक्षिका यांनी आपल्या भूमिका यशस्वी पार पाडत यावर्षी प्रशालेने निश्चित केलेली ‘शिस्त, स्वच्छता व गुणवत्ता’ ही त्रिसूत्री विद्यार्थ्यांनी दिवसभर तंतोतंत अमलात आणत शिक्षक दिनाच्या उपक्रमाला विशेष उंची प्राप्त करून दिली. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अध्यापनाचा अनुभव मिळावा आणि शिक्षकांच्या जबाबदारीची जाणीव व्हावी, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध वर्गांमध्ये जाऊन अध्यापन केले, विद्यार्थ्यांशी संवाद साधला, प्रश्नोत्तरे घेतली तसेच वर्गव्यवस्थापनाचा अनुभव घेतला. शिक्षकाची भूमिका पार पाडताना विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह आणि आत्मविश्वास दिसून आला. आपल्या आवडत्या शिक्षकांप्रमाणे शिकवण्याचा प्रयत्न करताना विद्यार्थ्यांनी शिस्त, संयम आणि जबाबदारीचे महत्त्वही अनुभवले. राधिका फफाळ हिने प्रास्ताविकामधून कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली. संस्कृती नवले, वैष्णवी जाधव, गायत्री खेडकर, स्वागत कोकितकर यांनी आजच्या दिवसाचे अनुभव व्यक्त करत ‘शिक्षक होणे म्हणजे केवळ शिकवणे नव्हे, तर विद्यार्थ्यांना घडविण्याची मोठी जबाबदारी आहे,’ याची जाणीव या उपक्रमातून झाल्याचे सांगितले. संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विद्यालयाचे प्राचार्य किसन राठोड यांनी विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे कौतुक करून त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपप्राचार्य प्रशांत सोनवणे, पर्यवेक्षिका हेमांगी उपरे, सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदिती घुंडरे व श्रेया घुंडरे यांनी केले. व उपस्थित सर्वांचे आभार गायत्री जोशी हिने व्यक्त केले. शिक्षकांच्या कार्याचा अनुभव देणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, आत्मविश्वास व जबाबदारीची भावना निर्माण करणारा हा उपक्रम संस्मरणीय ठरला. सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण पिंगळे, विठ्ठलदास गुट्टे, संदीप वालकोळी, श्रीकांत घुंडरे, योगेश मठपती, सूर्यकांत खुडे, रामदास वहिले यांनी सहकार्य केले.

No comments: