SHRIMANT

Saturday, December 28, 2024

विद्यार्थ्यांनी लुटला सहलीचा आनंद

शुक्रवार दि. 27 डिसेंबर 2024
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर प्राथमिक विद्या मंदिर व श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज आळंदी देवाची ही प्रशाला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच अग्रेसर असते. विद्यार्थ्यांना निरीक्षण क्षमतेचा विकास तसेच प्रत्यक्ष अनुभवातून ऐतिहासिक, भौगोलिक ,धार्मिक ठिकाणांची माहिती व्हावी यासाठी प्रशालेने शिवनेरी किल्ला, माणिकडोह धरण, लेण्याद्री, ओझर, गुळुंचवाडी नैसर्गिक पूल, आळे येथील भगवान रेडेश्वर महाराज समाधी या ठिकाणी सहलीचे आयोजन केले. सहलीसाठी एकूण 14 एसटी बसचे नियोजन केले होते. या सहलिमध्ये इयत्ता तिसरी ते दहावीचे एकूण 600 विद्यार्थी सहभागी झाले होते. श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव तथा अजित वडगांवकर व शिक्षक पालक संघाचे सदस्य संतोष इंगळे यांच्या हस्ते आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या उपस्थितीत सहलीच्या गाड्यांचे पूजन करण्यात आले. या प्रसंगी संस्था सचिव अजित वडगांवकर यांनी प्रशालेच्या उपक्रमाचे कौतुक करून सहलीसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांनी हरहर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत, पोवाडे गात शिवनेरी किल्ल्यावर चढून शिवनेरी किल्ल्याचा इतिहास जाणून घेतला. त्याचबरोबर भारत हा देश कृषीप्रधान असल्याने चार महिने पडणाऱ्या पावसाचे पाणी साठवून त्याचा वर्षभर कसा उपयोग केला जातो? हे समजून घेण्यासाठी माणिकडोह धरण पाहून त्याची माहिती व तेथील धरणाची कार्यपद्धती समजावून घेतली. लेण्याद्री व ओझरच्या गणपतीचे दर्शन घेतले. विद्यार्थ्यांना निसर्गाची आवड निर्माण व्हावी, निसर्गातल्या नैसर्गिक गोष्टींचे ज्ञान व्हावे म्हणून गुळूंचवाडी येथील नैसर्गिक पूल पाहून विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष निसर्गातील भौगोलिक बदलाचा अनुभव घेतला. ज्या रेड्यामुखी संत ज्ञानेश्वर महाराजांनी देवभाषा संस्कृतमधील वेद बोलविले त्या भगवान रेडेश्वराची समाधी आळे असून तेथील माहिती विद्यार्थ्यांनी जाणून घेतली. ज्ञानेश्वर महाराज रेडा समाधी संस्थान तर्फे विद्यार्थ्यांना अन्नप्रसाद देण्यात आला. शैक्षणिक उपक्रमासाठी पालक संतोष इंगळे व गुळूंचवाडी ग्रामस्थांकडून मुलांना खाऊ देण्यात आला. तसेच या पूर्ण सहलीवर परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातात. प्राचार्य सूर्यकांत मुंगसे व मुख्याध्यापक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलप्रमुख हेमांगी उपरे, श्रीरंग पवार, शारदा साबळे, वैशाली शेळके इत्यादी शिक्षकांनी महत्वाची जबाबदारी पार पाडली. यासाठी सर्व शिक्षक - शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

No comments: