SHRIMANT

Monday, September 29, 2025

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात महाभोंडला उत्साहात साजरा

पुणे आळंदी- पारंपारिक नृत्य व गीतामधून विद्यार्थिनींनी महिला पालकांनी व शिक्षिकांनी लुटला आनंद
श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था संचलित श्री ज्ञानेश्वर विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबरच त्यांचा शारीरिक, मानसिक, कलात्मक, सामाजिक व भावनिक विकास होण्याकडे प्रशालेचा कल असतो. त्यादृष्टीने प्रशाला दरवर्षी वेगवेगळे सहशालेय उपक्रम राबवत असते. त्या अनुषंगाने याही वर्षी प्रशालेत नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. भोंडला मराठी संस्कृतीतील एक प्राचीन परंपरा आहे. ही परंपरा केवळ आनंदासाठी नाही तर निसर्गाशी जुळलेले आदर, शेतीसाठी शुभेच्छा आणि सामाजिक एकात्मता वाढवण्यासाठी देखील आहे. गरब्याचा त्यानिमित्ताने मुली आणि महिला सगळे एकत्र येतात मनोरंजना बरोबरच त्यातून स्त्री सशक्तिकरणास चालना मिळते. अलमा पैलमा गणेश देवा, एक लिंबू झेलू बाई, कारल्याचा वेल, वेड्याच्या बायकोने इत्यादी गीतांचे गायन करून फेर धरण्यात आला.
याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर , मंजुश्री वडगावकर तसेच सुमनताई कुऱ्हाडे, सुनीता पाटील व निकिता पाटील, पालक शिक्षक संघाच्या उपाध्यक्षा सुरेखा लोहोर, माता पालक संघाच्या उपाध्यक्षा मनीषा केदार, विद्यालयाचे प्राचार्य सूर्यकांत मुंगसे उप प्राचार्य किसन राठोड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, पर्यवेक्षक प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर ,अनुजायीनी राजहंस ,ज्येष्ठ लिपिक संगीता पाटील इत्यादी मान्यवरांच्या शुभहस्ते हस्ते पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या औचित्य साधून संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांची पुणे जिल्हा संस्थाचालक शिक्षण मंडळाच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या सर्व घटकांच्या वतीने शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देत सन्मान करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना अजित वडगावकर यांनी ही निवड व हा सन्मान माझा नसून या संस्थेच्या विकासासाठी तन-मन-धनाने काम करणाऱ्या सर्व घटकांचा असल्याचे सांगितले. या महाभोंडला कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला पालकांना आमंत्रित करण्यात आलेले होते. त्यातून उपस्थित महिला पालकांसाठी लकी ड्रॉ चे आयोजन करण्यात आले. यातून पहिल्या पाच महिलांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. तसेच महिला पालक आरती आहेर यांना मानाची पैठणी देऊन सन्मानित करण्यात आले. नंतर संगीतावर विद्यार्थिनी ,महिला पालक व अध्यापिका यांनी दांडिया, गरबा नृत्यामधून आनंद लुटला. व शेवटी खिरापत वाटून कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा खेसे यांनी केले.

No comments: