SHRIMANT

Friday, March 6, 2026

सुरेश वडगावकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यानिमित्त मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व रक्तदान शिबिर उत्साहात

डिजिटल मीडिया mee24taas सुरेश वडगावकर यांच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्याच्या औचित्य साधून शिवतेज मित्र मंडळाच्या तर्फे सामाजिक बांधिलकी जपत मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर व रक्तदान शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पद्मश्री मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन नारायणगाव यांच्या वतीने या शिबिरात तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने ४२१ नागरिकांची नेत्र तपासणी करून आवश्यक त्यातील २१ रुग्णांची मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी नोंदणी केली. या २१ रुग्णांसाठी मोफत शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. डोळ्यांचे आरोग्य, योग्य आहार, नियमित तपासणी याबाबत मार्गदर्शनही करण्यात आले. त्याचबरोबर रेड ब्लड बँकेच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात युवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत रक्तदान केले. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत अनेकांनी स्वेच्छेने रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडली. या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पिंपरी चिंचवड जिल्ह्याचे राष्ट्रीय संरक्षण स्वयंसेवक संघाचे कार्यवाही नरेंद्र पेंडसे, श्री ज्ञानेश्वर महाराज देवस्थानचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, जैन साधू पंकज मुनी, सुरेश वडगावकर, अजित वडगावकर, शंतनू पोफळे आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले. या सामाजिक उपक्रमांमुळे सहस्त्रचंद्रदर्शन सोहळ्यास सेवा व समर्पणाची जोड मिळाली. उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक करत अशा विधायक उपक्रमांची समाजाला नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी आणि जनजागृतीसाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरला. प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष आनंदराव मुंगसे यांनी तर सूत्रसंचालन राहुल चव्हाण यांनी केले पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments: