SHRIMANT

Tuesday, May 12, 2026

महाराष्ट्र तेजोत्सव" कैवल्यवारी - पावलांची संगीत वारी कार्यक्रमाचे महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या वतीने आळंदीत आयोजन

आळंदी पुणे प्रकाश, कला आणि संस्कृतीचा उत्सव महाराष्ट्र राज्य पर्यटन विभाग,आळंदी नगरपरिषद, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान व आळंदी ग्रामस्थ आणि आय रियालिटीज या संस्थेचे प्रसाद आसगावकर यांच्या संयुक्त विद्यमाने आळंदी देवाची येथे आयोजित करण्यात आलेल्या “महाराष्ट्र तेजोत्सव २०२६” अंतर्गत “कैवल्यवारी – पावलांची संगीत वारी” या सांस्कृतिक कार्यक्रमांची पर्वणी १२ मे ते १४ मे रोजी सायं ७:३० वाजता इंद्रायणी घाटावर रंगणार आहे. प्रकाश, कला आणि संस्कृतीचा अनोखा संगम अनुभवण्यासाठी भाविक व रसिकांची मोठी गर्दी होणार आहे.
१२ मे रोजी सायं ७:०० वाजता “महाराष्ट्र तेजोत्सव” कार्यक्रमाचे उद्घाटन इंद्रायणी घाट, देवाची आळंदी येथे होणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७.३० वाजता “कैवल्यवारी – पावलांची संगीत वारी” या विशेष संगीत मैफलीत सुप्रसिद्ध गायिका अंजली मराठे, रश्मी मोघे आणि युवा गायक अक्षय घाणेकर आपल्या सुरांनी वातावरण भक्तिमय करणार आहेत. अभंग, भारूड आणि वारकरी संगीतातून भक्तिरसाची अनुभूती रसिकांना मिळणार आहे. १३ मे रोजी संध. ७.३० वा. संगीताचार्य डॉ. वृशाली शरांग दाबके आणि त्यांच्या शिष्यांचा विशेष संगीत कार्यक्रम रंगणार आहे. वारकरी संप्रदायातील अभंग, नृत्यनाट्य आणि सांस्कृतिक सादरीकरणांच्या माध्यमातून भक्ती आणि संस्कृतीची अनोखी मेजवानी रसिकांना अनुभवता येणार आहे. आणि १४ मे रोजी सं. ७.३० वा. राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त तरुण भारूडकार कृष्णाई उळेकर यांचा भारूड कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. विनोद, समाजप्रबोधन आणि अध्यात्म यांचा संगम असलेले भारूड सादरीकरण प्रेक्षकांचे विशेष आकर्षण ठरणार आहे. इंद्रायणी घाट परिसरात होणाऱ्या या तीन दिवसीय सांस्कृतिक सोहळ्यामुळे आळंदी नगरी भक्ती, संगीत आणि संस्कृतीच्या तेजाने उजळून निघणार असून नागरिकांनी व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आळंदी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत दादा कुऱ्हाडे व श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त ह.भ.प.चैतन्य महाराज लोंढे (कबीर बुवा) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments: