SHRIMANT

Tuesday, November 19, 2024

दोघीही गर्भवती आहेत

दोघीही गर्भवती आहेत.
एकीचा फोटो मुद्दाम घेतला गेला आणि एकीने आपला फोटो मुद्दाम काढला. एक गर्भवती असताना सुद्धा पोटाची खळगी भरण्यासाठी वाढलेल्या पोटाला झाकत मेहनत करत आहे आणि एक त्याच वाढलेल्या पोटाचं उघडपणे प्रदर्शन मांडत आहे. भारत आणि India मधला फरक आहे का हा? भारतीय संस्कृती आणि भारतीय संस्कृतीवर पाश्चिमात्य संस्कृतीच्या अतिक्रमणाचं वास्तव दाखवणारा फोटो आहे का हा? (फोटो इंटरनेट वरुन साभार)

Monday, November 18, 2024

आंधळी असूनही ती देशासाठी पदक जिंकते, पण लोक मात्र रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करतील

आंधळी असूनही ती देशासाठी पदक जिंकते, पण लोक मात्र रीलवर नाचणाऱ्या पोरींनाच लाईक करतील 😔...
🌟 कांचनमाला पांडे – धैर्य, संघर्ष आणि इच्छाशक्तीची एक प्रेरणादायी मूर्ती! महाराष्ट्राच्या नागपूरमधली ही लढाऊ मुलगी, पूर्णतः अंध असूनही पॅरा-स्विमिंगमध्ये भारताला सन्मान मिळवून देते. 2017 मध्ये मेक्सिकोच्या पॅरा स्विमिंग चॅम्पियनशिपमध्ये तिने रौप्य पदक पटकावून इतिहास घडवला, आणि भारतातील पहिली महिला पॅरा-जलतरणपटू बनली ज्याने जागतिक स्तरावर पदक मिळवलं 🥈🇮🇳. कांचनमालाची कहाणी म्हणजे जिद्द आणि मेहनतीचा प्रकाश! आर्थिक अडचणी असतानाही तिने तिच्या स्वप्नांना धावत ठेवले. तिच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी आधार दिला, पण यशाचं खरं कारण तिची जिद्द आणि अपार मेहनत होती 💪❤️.
🔥 कांचनमालाचा प्रवास आपल्याला शिकवतो की अडचणी कितीही असोत, त्यावर मात करणं आपल्या हातात असतं. ती एक प्रकाशकिरण आहे, जो दाखवतो की सत्य इच्छाशक्तीने कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं! तुम्हीही तिच्या या संघर्षमय प्रवासातून प्रेरणा घ्या, आणि तिच्या यशाची कहाणी इतरांपर्यंत पोहोचवा – कारण हीच खरी शक्ती आहे! 💯✨ दैनिक वडार समाचार

Sunday, November 17, 2024

आळंदीत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर कालावधीत धार्मिक सोहाळा

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : आळंदी कार्तिकी यात्रा २०२४ अंतर्गत श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधीत विविध धार्मिक उपक्रमांसह प्रथा परंपरांचे पालन करीत साजरा होणार आहे. २६ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी आणि २८ नोव्हेंबरला श्रींचा मुख्य ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा लाखो वारकरी भाविकांच्या नामजयघोषात होणार असल्याची माहिती श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर यांनी दिली. या सोहळ्याचे नियोजन श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीचे प्रमुख विश्वस्त विधीतज्ञ राजेंद्र उमाप, विश्वस्त डॉ. भावार्थ देखणे, विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांचे मार्गदर्शनात जाहीर करण्यात आले आहे. प्रथा परंपरांचे पालन करीत माऊली मंदिरात होणाऱ्या परंपरेचे कार्यक्रम आळंदी देवस्थान तर्फे जाहीर करण्यात आले असून सोहळ्याची तयारी आळंदी मंदिरात सुरु करण्यात आली आहे. सोहळ्यात शनिवार ( दि. २३ ) सकाळी ७ ते ९ या वेळेत हैबतबाबा यांचे वंशज, प्रतिनिधी ह.भ.प. बाळासाहेब महाराज आरफळकर पवार यांच्या तर्फे हैबतबाबांच्या पायरीचे पूजन हरिनाम गजरात होऊन सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. मंगळवार ( दि. २६ ) आळंदीत कार्तिकी एकादशी साजरी होणार आहे. रात्री साडेबारा ते पहाटे २ या वेळेत ११ ब्रम्हवृंदांच्या वेदमंत्र जय घोषात माऊलींच्या समाधीवर पवमान अभिषेक व दुधारती होईल. यावेळी दर्शनरांगेत उभे असलेल्या पहिल्या दाम्पत्याला या महापूजेचा मान दिला जातो. देवस्थान तर्फे मान्यवर दाम्पत्य यांचा सत्कार केला जातो. दुपारी १ वाजता श्रींची पालखी नगरप्रदक्षिणा होईल. बुधवार ( दि. २७ ) पहाटे साडे तीन ते चार या वेळेत खेडचे प्रांत अधिकारी अनिल दौन्डे यांच्या हस्ते पंचोपचार पूजा होईल. त्यानंतर दुपारी ४ ते सायंकाळी ७ यावेळेत पुरातन २३ फूट उंचीचे वैभवी लाकडी रथातून श्रींची भव्य रथोत्सव मिरवणूक होईल. मंदिराच्या गाभाऱ्यात रात्री ११ ते १२ या वेळात खिरापत पूजा, फडकरी, मानकरी, दिंडी प्रमुख, सेवेकरी यांना नारळ प्रसाद वाटप होणार आहे. गुरुवारी ( दि. २८ ) माऊलींचा ७२९ वा संजीवन समाधी दिन सोहळा हरिनाम गजरात होणार आहे. यात सकाळी ९ ते दुपारी १२ यावेळेत परंपरे नामदास महाराज यांचे संजीवन समाधी सोहळ्याचे प्रसंगावर आधारित कीर्तन सेवा होईल. दुपारी १२ ते साडेबारा या वेळेत संजीवन समाधी सोहळ्या निमित्त घंटानाद, पुष्पवृष्टी, आरती आणि मान्यवरांना नारळ प्रसाद वाटप होणार आहेत. रविवार ( दि. १ ) रात्री साडेनऊ ते साडेबारा या वेळेत श्रींचा छबीना मिरवणूक होणार आहे.
या सोहळ्यात २३ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या कालावधित माऊली मंदिरात दररोज पवमान अभिषेक, दुधारती, भाविकांच्या महापूजा, महानैवेद्य, कीर्तन, धुपारती, जागर असे धार्मिक कार्यक्रम प्रथा परंपरांचे पालन करीत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Saturday, November 16, 2024

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन

श्री ज्ञानेश्वर विद्यालयात शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन
विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानात स्वारस्य वाढवणे, आवडीच्या विषयात नवीन तथ्ये आणि शोध शिकण्यास प्रोत्साहित करणे, सर्जनशील प्रतिभेचे अन्वेषण करणे, चौकटीच्या बाहेर विचार करण्यास प्रोत्साहित करणे, कल्पनाशक्ती आणि वैज्ञानिक दृष्टीकोन विकसित करणे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना दिशा देणे, विज्ञान प्रदर्शनांचा प्राथमिक उद्देश विद्यार्थ्यांना व्यावहारिक प्रयोग आणि प्रकल्पांद्वारे विविध वैज्ञानिक संकल्पना आणि तत्त्वे शोधण्यासाठी प्रोत्साहित करणे, यामुळे पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विज्ञानाचे सखोल ज्ञान वाढवणे इ. गुणांचा विकास होण्याच्या हेतूने श्री ज्ञानेश्वर विद्यालयात संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांच्या शुभ हस्ते शालेय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन संपन्न झाले. विज्ञान प्रदर्शनामध्ये इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी १३१ प्रकल्प मांडले होते. यामध्ये दळणवळण, ऊर्जा समस्या, शेती, जलशुद्धीकरण इ.विषयावर प्रकल्प मांडले. शालेय विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्ताने प्रशालेमध्ये निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा व प्रश्नमंजुषा आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य दीपक मुंगसे, उपप्राचार्य सुर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता पडळकर, विज्ञान विभाग प्रमुख संजय उदमले, नारायण पिंगळे, संजय कंठाळे, कल्पना घोलप, आरती वडगणे, अनुराधा खेसे, योगेश मठपती, पूजा चौधरी, पूजा कलशेट्टी, विज्ञान प्रयोगशाळा प्रमुख बाळासाहेब भोसले, अरविंद शिंदे आदी उपस्थित होते.
यावेळी अजित वडगावकर यांनी भविष्यात नक्कीच विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होऊन संशोधक निर्माण होतील असे मत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत शुभेछ्या दिल्या. तसेच दीपक मुंगसे यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा पवार यांनी केले. तसेच सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले व संजय उदमले यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Friday, November 15, 2024

आळंदी पंचक्रोशीत काकडा आरतीची हरिनाम गजरात सांगता मंदिरांत पुष्प सजावट लक्षवेधी

आळंदी पंचक्रोशीत काकडा आरतीची हरिनाम गजरात सांगता मंदिरांत पुष्प सजावट लक्षवेधी
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील पुणे आळंदी रस्त्यावरील श्री काशी विश्वेश्वर महाराज मंदिरात १९७३ पासून सुरु झालेली काकडा आरतीची परंपरा गेल्या ५१ वर्षांपासून अखंड काकडा आरती सुरु आहे. यात उत्तरोत्तर वाढ झाली असून आता युवक तरुण देखील यात सहभागी झाले आहेत. नागरिक भाविकांची पहाटे पासून काकडा आरतीला गर्दी वाढत आहे. माऊली मंदिरासह श्री ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर तसेच विविध मठ, मंदिरे, धर्मशाळा परिसरात विविध गावांमध्ये ही काकडा आरतीची परंपरा जतन केली जात आहे. या काकडा आरतीची सांगता त्रिपुरारी पौर्णिमा दिनी पुष्प सजावटीसह धार्मिक परंपरांचे पालन करण्यात आले. आळंदीतील काळेवाडी येथील श्री काशी विश्वेश्वर विठ्ठल मंदिरात कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमे पर्यंत काकड आरती चे आयोजन करण्यात आले होते. श्री काशी विश्वेश्वर मंदिरात पहाटे पाच ते सात या वेळेत धार्मिक कार्यक्रम कार्तिक स्नान, काकड आरतीची सुमधुर अभंग ,भजन ,गवळणी, गायन असे कार्यक्रम झाले आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेला काकडा आरती समाप्ती शुक्रवारी ( दि. १५ ) काल्याचे किर्तन ह. भ. प. नंदकुमार बंदीष्टे महाराज यांचे कीर्तनाने सांगता झाली. काळेवाडी येथे काशी विश्वेश्वर मंदिरात कार्तिक स्नान निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले. ज्ञानाई भजनी मंडळ, काळेवाडी यांचे भजन, वाघजाई भजनी मंडळ यांचे संगीत भजन, शुक्रवारी पहाटे काकडा आरती व महापूजा, महाप्रसाद वाटप उत्साहात झाले. कार्यक्रमाचे संयोजन बंडू उर्फ नाना काळे, समस्त काळेवाडी ग्रामस्थ यांचे वतीने करण्यात आले होते. काल्याचे किर्तन झाल्यानंतर सर्व भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. विश्वस्त प्रकाश काळे, बाबूराव काळे, शाबाजी काळे गुरुजी, सुरेश झोंबाडे, रामदास निकस, हनुमंत तापकीर, किरण काळे, गणेश पवार, स्वप्निल काळे, शंकर वाजे, धनाजी काळे, अशोक तापकीर आदींनी विशेष परिश्रम घेतले. श्री काशी विश्वेश्वर महाराज मंदिरात काकडा आरतीचा उपक्रम ५१ वर्षांपासून सुरु असल्याचे बंडूनाना काळे यांनी सांगितले. यात विविध धार्मिक कार्यक्रम होत आहेत. काळेवाडी मधिल नागरिकांच्या माध्यमातून हा उपक्रम अखंड सुरु आहे. यात दैनंदिन काकड आरती, भजन व महापूजा आदींचा समावेश आहे. या वर्षीची सांगता काकडा आरती महापूजा, ग्राम दिंडी प्रदक्षिणा, काल्याचे हरिकीर्तन आणि महाप्रसाद वाटपाने होणार आहे. आळंदी काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीने या काकडा आरतीचे परंपरेने आयोजन करण्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षां पासून काळेवाडीतील श्री काशीविश्वेश्वर महाराज मंदिरात काकडा आरती उत्सवात विविध अभंग आणि किर्तन, गायनाने भल्या पहाटे पासून भक्ति मंगलमय वातावरणात काकडा आरती व प्रसाद वाटप सुरु झाले आहे. या मंदिराचा नुकताच जीर्णोद्धार करण्यात आल्याने मंदिरही प्रशस्त झाले आहे. यामुळे मंदिरात परिसरातून भाविकांची उपस्थिती वाढली आहे. आळंदीत वारकरी संप्रदाय आणि संत परंपरेची विचारधारा काकडा आरतीने ही समाजात रुजली आहे. तीर्थक्षेत्र आळंदीतील माऊली मंदिरासह विविध मठ, मंदिरे, धर्मशाळासह आळंदीतील पंचक्रोशीतील विविध गावांमध्ये ही काकडा आरतीची परंपरा जतन केली जात आहे. यात युवक तरुणांचा सहभाग देखील लक्षणीय आहे. अडबंगनाथ मंदिरात काकड आरती उत्साहात डुडुळगाव ( ता. हवेली ) येथील अडबंगनाथ मंदिरात देखील काकड आरतीचा धार्मिक कार्यक्रम हरिनाम गजरात झाला. या ठिकाणी नियमित पहाटे चार ते साडेसात पर्यंत धार्मिक कार्यक्रम, काकडा, आरती सह भजन कीर्तन, प्रवचन आदी धार्मिक कार्यक्रम पहाटे मंगलमय वातावरणात झाले. यासाठी डुडूळगाव ग्रामस्थांसह परिसरातील भाविक भक्त यांची उपस्थिती मोठी राहिली. डुडूळगाव येथील धार्मिक पंथातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरूण वर्ग, महिला व भाविक या ठिकाणी पहाटे काकड आरतीचा अनुभव घेत आहेत. माउली मंदिरात ही मंदिरातील प्रथांचे पालन करीत धार्मिक कार्यक्रमांनी काकडा उपक्रम राबविण्यात आला. निघोजेत भैरवनाथ मंदिरात महीनाभर काकड आरती ; हरिनाम गजरात निघोजे येथील भैरवनाथ मंदिरामध्ये महीनाभर चालणारी काकड आरती आजच्या दिवशी सांगता हरिनाम गजरात विविध कार्यक्रमांनी झाली. महीला मंडळ व निघोजे ग्रामस्थ यांच्या हासते महापुजा आयोजित करुन सकाळी ९ ते १० यावेळी गावातुन दिंडी मिरवणूक काढण्यात आली, मंदिरामध्ये आज ,टाळ, मृदंग ,वीणा, पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन पालखी व विठ्ठल विठ्ठल ज्ञानोबा माऊली भजन करीत, गावातील ग्रामस्थ व महिला यांनी दिंडीचा आनंद घेतला, गवळण फुगडी खेळताना भावीक उत्साहीत वाटत होते,व गावातील ग्रामस्थ व महिला यांनी काल्याचा माहाप्रसाद घेण्यात आला व काकड आरतीच्या काल्याची समाप्ती करण्यात आली, तीर्थक्षेत्र आळंदीतील श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज मंदिरात काकड आरती ची सांगता हरिनाम गजरात झाली यावेळी रामचंद्र बोरुडे महाराज यांचे काल्याचे किर्तन झाले तत्पूर्वी हरिपाठ त्यानंतर तुलसी विवाह रात्री दीपोत्सव काकडा महाप्रसाद वाटप मोठ्या उत्साहात करण्यात आले भाविकांनी श्रींचे दर्शनास गर्दी करून दर्शन घेतले. यावेळी श्री ग्रामदैवत भैरवनाथ महाराज यांचे पालखीची ग्राम प्रदक्षिणा उत्साहात झाली. आळंदी भैरवनाथ मंदिरात दीपोत्सव त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्त उत्साहात झाला. यावेळी श्रीजीत कुऱ्हाडे यांचे तर्फे काकडा महाप्रसाद झाला. यावेळी आळंदी ग्रामस्त, श्रीक्षेत्रोपाध्ये श्रींचे पुजारी भैय्या उर्फ ज्ञानेश्वर वाघमारे, सुरेश वाघमारे , मंगल वाघमारे, पंडित रानवडे, वसंत घुंडरे, दत्तात्रय कुऱ्हाडे, विशाल रानवडे, बाळासाहेब घुंडरे, दळवी मामा, उत्सव समिती अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे, ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, आळंदी ग्रामस्त, पदाधिकारी, गावकरी भजनी मंडळ आदी उपस्थित होते. गेला महिनाभर काकडा निमित्त पूजा, आरती, महा प्रसाद, भजन, कीर्तन आदींसह धार्मिक कार्यक्रम परंपरांचे पकडणं करीत हरिनाम गजरात झाले.

Tuesday, August 27, 2024

आळंदी शहर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर !

निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे
आळंदी शहर पथविक्रेता समितीच्या एकूण 20 सदस्यांपैकी 8 सदस्य हे शहरातील नोंदणी कृत 365 पथ विक्रेत्यांकडून निवडायचे असून सदर निवडणुकी पूर्वी दिनांक 27 ऑगस्ट रोजी आळंदी नगरपरिषद कार्यालयात आरक्षण सोडत कार्यक्रम पार पडला असून त्यात एकूण 8 जागांपैकी 3 जागा महिला पथ विक्रेत्यां करिता आरक्षित असून त्या अल्प संख्यांक महिलांसाठी 1, इतर मागास प्रवर्ग महिला 1 आणि खुला प्रवर्ग महिला साठी 1 यानुसार निश्चित झाल्याची माहिती मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद तथा निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.
आरक्षण सोडत कार्यक्रम पूर्ण झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी कैलास केंद्रे यांनी आळंदी शहर पथ विक्रेता समिती सदस्य निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून सदर निवडणुका 28 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर या कालावधीत पार पडणार आहेत.

Sunday, August 25, 2024

‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे’

‘पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यात यावे’ पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे नाव देण्यासाठी, राज्य शासनाने तसा प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे पाठवावा, यासंदर्भात मुख्यमंत्री माननीय श्री. एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय श्री. देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री माननीय श्री. अजितदादा पवार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली.
आपल्या भूमिकेवर राज्य सरकारही सकारात्मक असून लवकरच हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर केंद्र सरकारकडे आपण याचा पाठपुरावा करणार आहोत.
विमानतळाचे नामकरण करतानाचा नावाचा प्रस्ताव हा राज्य सरकारकडून केंद्र सरकारकडे येत असतो आणि त्यानंतर नामांतरावर शिक्कामोर्तब होतं, म्हणूनच पुण्याचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्य सरकारकडे ही भूमिका मांडली आहे.
पुण्याचं विमानतळ असलेल्या लोहगावमध्ये जगद़्गुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचं आजोळ होतं. त्यामुळे लोहगाव आणि तुकोबारायांचं नातं जिव्हाळ्याचं होतं. शिवाय लोहगावच्या गावकऱ्यांचीही आपल्या भूमिकेप्रमाणेच इच्छा असून महाराष्ट्रातील तमाम वारकरी सांप्रदायाचीही संवेदना या विषयाशी जोडलेली आहे. त्यामुळे लोहगावच्या विमानतळाला तुकोबारायांचं नाव देणं, हे अधिक समर्पक असणार आहे. Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

Thursday, August 22, 2024

बदलापूर घटनेच्या अनुषंगाने शाळा, कॉलेज मधील संस्थापक, प्राचार्य, शिक्षक यांची मिटिंग आयोजित केली होती.

शाळा कॉलेज प्रतिनिधींची बैठक घेतली बाबत आज दिनांक 22/8/2024 रोजी पोलीस स्टेशन आळंदी येथे बदलापूर घटनेच्या अनुषंगाने शाळा, कॉलेज मधील संस्थापक, प्राचार्य, शिक्षक यांची मिटिंग आयोजित केली होती.
उपस्थित शाळेच्या प्रतिनिधींना शाळा परिसरात सी. सी. टी. व्ही. बसवावेत, पालक सभा घ्याव्यात, स्कूल बस ड्रायव्हर तसेच इतर सर्व स्टाफ चे पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणे, मुलांच्या सुरक्षितते संबंधी शासनाच्या नियमांचे काटेकोर पालन करणे, सखी सावित्री समितीची स्थापना करणे, तसेच मुलांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने इतर खबरदारी घेणेबाबत योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत. सदर मिटिंग साठी एकूण 22 शाळांचे प्रतिनिधी उपस्थित होते. तसेच आळंदी नगरपरिषद चे अधिकारी सुद्धा उपस्थित होते. आदरपूर्वक सादर…. (बी.एस. नरके) वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी पोलीस स्टेशन.

Monday, August 19, 2024

ज्ञानेश्वर महाराज मंदिरात रक्षाबंधन दिनी मुक्ताईची ज्ञानदेवांना राखी

ज्ञानेश्वर महाराज मंदिरात रक्षाबंधन दिनी मुक्ताईची ज्ञानदेवांना राखी आळंदी: येथील श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात रक्षाबंधन दिनी श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाठविलेली राखी श्रींचे समाधीला स्पर्श करीत श्री संत मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांचे हस्ते अर्पण करण्यात आली.
श्री संत मुक्ताबाई संस्थान मुक्ताईनगर जिल्हा जळगाव यांचे वतीने मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटी आळंदी विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांचे प्रमुख उपस्थितीत श्रींना रक्षा बंधन दिनी श्रींचे संजीवन समाधीस स्पर्शीत करून राखी अर्पण करण्यात आली. या प्रसंगी जयंतराव महल्ले, संदीप दादा पाटील, अंकिता पाटील, महामंडलेश्वर जनार्दन हरि चैतन्यजी महाराज, गजानन महाराज लाहुडकर, विशाल महाराज खोले, विचारसागर महाराज लाहुडकर, संतोष चैतन्यजी महाराज, राजेश पाटील, श्रीकांत महाजन, आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर, आदी मान्यवर, वारकरी भावीक यांचे उपस्थितीत माऊली मंदिरात श्रीनां राखी अर्पण करीत भारतीय संस्कृती जोपासत रक्षा बंधन साजरी करण्यात आली. यावेळी वाघोलीतील गाडे परिवार तर्फे देखील श्रीनां रक्षाबंधन दिना निमित्त सोन्याची राखी अर्पण करण्यात आली. यावेळी दर्शनास भाविकांनी मंदिरात तसेच महाद्वारात गर्दी केली. आळंदी मंदिर परिसरात भाविकांसह भाविक व पंचक्रोशीतील वाहनाची प्रचंड गर्दी होती. श्रावणी सोमवार, रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा असा त्रिवेणी संगम साधत भाविकांनी मंदिरात श्रींचे रांगा लावून दर्शनास गर्दी केली होती. आळंदी देवस्थानचे व्यवस्थापक माऊली वीर यांनी रक्षाबंधन दिनी आलेल्या सन्माननीय राख्याची माहिती दिली. मुक्ताईची श्रींसाठीची राखी देवस्थानच्या परंपरागत नियोजन प्रमाणे श्रीनां अर्पण करण्यात आली. रक्षाबंधन दिनाची येथील परंपरा श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानच्या वतीने पाटील महाराज आणि सर्व संबंधित संस्थान यांनी श्रीनां राखी पाठवीत परंपरा कायम ठेवली. यावेळी आदिशक्ती मुक्ताई यांच्याकडून श्रीक्षेत्र आळंदी, त्र्यंबकेश्‍वर आणि सासवड येथे ही श्रीनां राखी अर्पण करण्यास पोच करण्यात आली. आळंदी देवस्थानचे वतीने श्री आदिशक्ती मुक्ताबाई संस्थानचे अध्यक्ष आणि मान्यवर यांचा सन्मान आळंदी देवस्थानचे विश्वस्त व पालखी सोहळा प्रमुख योगी निरंजननाथजी यांचे हस्ते श्रीफळ प्रसाद भेट देऊन सत्कार करण्यात आला. आळंदीतील माऊली मंदिरासह परिसरातील घराघरांमध्ये रक्षाबंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मुक्ताई संस्थान तर्फे पाटील यांनी सपत्नीक श्रींची पुजा करीत मुक्ताईची ज्ञानदा साठीची राखी समाधीस स्पर्श करीत अर्पण केली. आळंदी संस्थान चे वतीने मुक्ताईस साडी चोळी सुपूर्द करण्यात आली. येथील श्री रामकृष्ण वारकरी शिक्षण संस्थेत देखील आपल्या आई, वडील आणि बहीण , भाऊ तसेच कुटुंबीय यांचे पासून दूर राहून आळंदीत शालेय शिक्षणा सह अध्यात्मिक शिक्षण घेणास निवासी राहत असलेल्या मुलं, मुलींसाठी रक्षा बंधन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेत रक्षा बंधन दिना निमित्त मुलांना राखी बांधून सण साजरा केला. यावेळी संस्थेचे वतीने सर्व मुलं-मुलींना सुग्रास स्नेहभोजन देण्यात आले. परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षा बंधन घराघरांत साजरे करण्यात आले. या प्रसंगी मोहन महाराज शिंदे, सचिन महाराज शिंदे आदी उपस्थित होते. परंपरांचे पालन करीत आळंदी पंचक्रोशीत रक्षा बंधन घराघरांत साजरे करण्यात आले.